नंदुरबार
आदिवासी बांधवांच्या कला आणि संस्कृतीची जपणूक व्हावी, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आदिवासी सास्कृतिक भवनाची संकल्पना पुढे आली असून या भवनामुळे आदिवासींच्या कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.
ॲड.पाडवी म्हणाले, आदिवासी बांधवामध्ये अनेक कला गुण आहेत. त्यांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागात सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना चांगली रुजली त्यासाठी सांस्कृतिक भवन उपयुक्त ठरतील. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उत्तम सुविधा नागरिकांना उपलब्ध झाली आहे. तळोदा नगर परिषदेस नगरोत्थान योजना, तसेच विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमांस मोठ्या संख्येने विद्यार्थी,ग्रामस्थ तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्र्याच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप
लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन नंदुरबार व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक नाबार्ड यांच्या नॅबस्किल प्रकल्पातंर्गत रुपाली मराठे, मीना मोरे, संगिता पावरा, मनिषा केदार, सुवर्णा ठाकरे या महिला लाभार्थींना पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. बाजारपेठेत उघड्यावर गाड्या लावणाऱ्या फेरीवाल्यांना छत्री वाटपही करण्यात आले. तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तालुक्यातील कापुस पिक घेणारे उत्कृष्ट शेतकरी, फळबाग धारकांचाही सत्कारही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुका क्रीडा संकुलास भेट
पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी तळोदा येथील तालुका क्रीडा संकुलास भेट देवुन क्रीडा संकुलाची पाहणी केली. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी चर्चा करुन क्रीडा संकुलात विविध साहित्य खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खेळाडूंमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी संकुलात आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पालकमंत्र्यांनी तळोदा येथील उप जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देवुन रुग्णाशी संवाद साधला. त्यांनी विविध वार्डात जावुन रुग्णाच्या समस्या जाणुन घेतल्या.
आमलाड येथील शासकीय वसतीगृहास भेट
पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी तळोदा तालुक्यातील आमलाड येथील शासकीय वसतीगृहास भेट देवुन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीचे त्वरीत निराकरण करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्वरीत शुध्दपाण्यासाठी मिनरल वॉटर यंत्रणा बसविण्याच्या सुचना वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या हस्ते आमलाड वसतीगृहात घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेतंर्गत पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देवुन सत्कार यावेळी करण्यात आला.
Comments
Post a Comment